दिल्ली : नोकरी घोटाळ्याच्या प्रकरणात, ईडीने दिल्ली, मुंबई आणि पाटणा येथे अनेक ठिकाणी छापे टाकले. यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांच्या मुलींच्या घरांसह दिल्लीतील १५ ठिकाणी ईडीच्या पथकाने छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे.
यासोबतच ईडीचे पथक राजदचे माजी आमदार के अबू दोजाना यांच्या पाटणा येथील घरीही पोहोचले असून छापेमारी सुरू आहे. माजी आमदार अबू दोजाना हे व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहेत.
चारा घोटाळ्यानंतर आता ‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’ घोटाळा लालू प्रसाद यादव यांना चांगलाच महागात पडत आहे. या प्रकरणी लालू यादव यांच्या अडचणी वाढत असल्याचं पाहायला मिळालं.
घरावर छापे
दोनच दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने लालू यादव यांची दिल्लीत चौकशी केली. दुसरीकडे, ईडीने शुक्रवारी दोन राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. लालू यादव यांच्या तीन मुलींच्या घरांवरही छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. हेमा, रागिणी आणि चंदा यांचे घर दिल्लीत आहे, ज्यांच्या घरी ईडीची टीम हजर आहे.